कहाणीत असूनही नसलेला नायक


काय काय करायला भाग पाडतं ना हे प्रेम? कोणत्याही अपेक्षेशिवाय मनापासून केलेलं आणि तरीही दुर्लक्षित राहिलेलं, विशेषतः एकतर्फी प्रेम.

'विद्या बागची', एक सॉफ्टवेयर इंजिनियर तिच्या हरवलेल्या पतीच्या शोधात कोलकातामध्ये दाखल होते आणि तिची भेट 'सत्योकी' उर्फ 'राना सिन्हा'शी होते. बिइंग अ जेंटलमन, पहिल्या भेटीपासून राना तिची मदत करू लागतो.

राना तिच्या या शोधमोहिमेत स्वतः ला कसा आणि कधी इतकं गुंतवून घेतो, हे त्यालाही कळत नाही. मग ते सुरुवातीला, तिला, तिचा नवरा राहत असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन जाणं असो, तिला वेळोवेळी हवं तिथे न्यायला येणे व परत हॉटेलला सोडणे असो, NDC च्या ऑफिसमध्ये घेऊन जाणे किंवा जुन्या बंद असलेल्या NDC च्या, शिवाय NDC ऑफिसर श्रीधरच्या ऑफिसमध्ये बेकायदेशीरपणे घुसणे असो, इंटेलिजेंस ब्युरोने डेप्युट केलेल्या 'खान' ची 'मिलन दामजी' ला पकडण्याची चाल लक्षात आल्यावर आणि त्यापासून विद्याच्या जीवाला धोका आहे हे कळल्यानंतर तिला वाचवण्यासाठी जीव तुटणे असो, या सगळ्यात कुठेतरी तो विद्यात खोलवर गुंतत चालला आहे हे हळुवारपणे दिसत राहतं.

आपल्याला प्यादा बनवून 'खान'ने विद्याकडून त्याला हवं ते करवून घेतलं आहे हे कळल्यानंतरही तो अस्वस्थ होतो. शिवाय अखेरीस, विद्यानेच, मिलन दामजीपर्यंत पोचण्यासाठी, त्याचा, खानचा आणि सर्व पोलीस सिस्टिमचा शिडीसारखा वापर केला आहे, हे कोडे उलगडल्यानंतरही तिच्यावर राग न धरणारा, सत्योकी खरोखर मनापासून आवडून जातो.

परमब्रता चॅटर्जी या बंगाली अभिनेत्याने खूपच ताकदीने हे कॅरॅक्टर उभे केले आहे. सुरुवातीला अगदीच दुय्यम वाटणारे हे कॅरॅक्टर हळूहळू मनाचा ठाव घेऊ लागते. त्याचे विद्यावर जडणारे प्रेम हे अलवार येत राहते आपल्यासमोर आणि हा एक केवळ दुय्यम किंवा सहाय्यक अभिनेत्यापेक्षा जरा जास्त महत्वाचा वाटू लागतो. विद्या आणि खानच्या दमदार रोलपुढे त्याचं अस्तित्व ठळक उठून दिसतं.

चित्रपटाच्या दोन वेगवेगळ्या प्रसंगी, दोन खूपच रिलॅटिव्ह सीन्स येतात, ते त्याने खूपच संवेदनशीलपणे पार पाडलेत.

एका सीनमध्ये, सुरुवातीला कॉम्प्युटरसमोर तो टाईप करत असताना नकळत विद्याचे त्याच्या जवळ येणे, ह्यातली त्याची निरागस आणि आनंददायी अस्वस्थता..

आणि उत्तरार्धात, विद्या त्याच्यावर राग धरून असताना, अश्याच कॉम्प्युटरसमोर त्याचे, तिच्या जवळ गेल्यावर तिचे दूर होणे, याच्यातली त्याचा जीव जाळणारी अस्वस्थता, खूप रिलॅटिव्ह आणि परिमाणकारक वाटते.

हिरोईनवर एकतर्फी निरपेक्ष प्रेम करणारे किंवा हिरोहुन जास्त सुटेबल आणि एलिजीबल असूनही फक्त फ्रेंडझोन्ड होणारे कॅरॅक्टर्स हा खरं तर एक वेगळा अभ्यासाचा विषय. अश्या निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आणि तरीही ग्रुपफोटोमध्ये कुठल्याश्या कोपऱ्यात उभ्या राहणाऱ्या, कॅरॅक्टरबद्दल कधी काही लिहिलं गेलं तर 'सत्योकी राना सिन्हा' त्यात नक्कीच असेल.

सध्या तो अनुष्काच्या होम प्रोडक्शनच्या 'परी'मध्ये पुन्हा दिसणार आहे. फर्स्ट लुकवरून चित्रपट वेगळा आहे, हे तरी नक्कीच कळतंय. अनुष्का आणि परमब्रता चॅटर्जी दोघांकडूनही वेगळं काहीतरी पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. लेट्स प्रे अँड वेट..!

- राज जाधव (१३-१०-२०१७)

Comments

Popular Posts