दंगल


'दंगल' मध्ये गीता नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये शिकायला जाते आणि त्यानंतर हळू हळू तिच्यावर लादलेली बंधने तिच्याही नकळत कमी होत जातात आणि तिला ते आवडायला लागतं. मग ते पाणीपुरी खाणे असो, टीव्ही पाहणे किंवा चित्रपट पाहणे आणि सर्वात महत्वाचे केस वाढवणे.

अश्यातच जेव्हा ती केस वाढवून जेव्हा घरी येते आणि तिच्यात आणि आमिर खान मधली जी फाईट आहे, ती अख्ख्या चित्रपटाचा आत्मा आहे. 

या सीनमध्ये एका बापाची, मातीतल्या कुस्तीशी जुडलेली नाळ, बाप आणि कोच म्हणून हरल्याची पुसटशी भावना आणि मुलीची, आपण आता बापाच्या पद्धती विसरून असामान्य रेसलर झालोत आणि आता बापालाही हरवू शकतो ही घमेंड फारच परिणामकारकरित्या समोर आली आहे. इथे एक हतबल बाप हरतो, मैदानातही आणि मैदानाबाहेरही. त्या पार्श्वभूमीवर गीता निघून जाताना बॅगराऊंडमध्ये वाजत राहतं ते.. हतबल बापाच्या देहबोलीत आमिर पडद्यावर वावरताना, अरिजितच्या आवाजातलं "नैना..". जीव तुटतो.

पुढे जाऊन ठरल्यानंतर जेव्हा तिला आपल्या चुकीची जाणीव होते, तेव्हा ती पूर्ववत होते ते वाढलेले केस कापून. वाढलेल्या केसांसोबत गळून पडतो तो तिचा अहंकारही. हे प्रतिकात्मकरित्या खूप परिणामकारक दिसतं पडद्यावर.

नितीश तिवारीने खूपच अप्रतिमरित्या गीताच्या हेयरस्टाईलला तिच्या स्वभावात होणाऱ्या बदलाशी जोडले आहे.

असं कुणी इतक्या बारकाईने काम केलं की खरंच वाटतं आपली इंडस्ट्री सेफ हातात आहे.

- राज जाधव (१५-०८-२०१७)

Comments

Popular Posts