प्रेमम


प्रेमम!

जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा मी असे खास चित्रपट शोधत असतो की जे नेहमीच्या पठडीतले नाहीयेत, ज्यात काहीतरी वेगळेपण आहे, न चुकवावं असं. मग ते हिंदी, मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम कोणतेही असो. माझ्या लिस्टमध्ये खूप दिवसांपासून जे नाव सगळ्यात वरती होते (तरीही पाहायला इतका उशीर झाला) ते म्हणजे, प्रेमम.

प्रेमम, एक हळुवार, तरल, मोरपंखी प्रेमकथा. चित्रपट सुरू होता आणि समोर पाटी पडते ती Special Thanks to God, Sun, Time & Love आणि तुम्हाला अंदाज येतो की काहीतरी वेगळं वाढून ठेवलं आहे पुढ्यात.

तसं पाहायला गेलं तर कहाणी जुनीच आहे, बर्याच वेळा सांगितलेली. कथेतही नाविन्य असे नाहीये. मग असे काय आहे की प्रत्येकाच्या ओठी हे नाव आहे?

सगळं काही ओळखीचं असलं तरी त्याची मांडणी वेगळी आहे, नेहमीच्याच गोष्टीला ट्रीटमेंट वेगळी दिलेली आहे. एका ओळीत सांगायचं झालं तर, जॉर्जच्या आयुष्याच्या तीन वेगवेगळ्या टप्प्यात तीन वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर त्याला झालेलं प्रेम. (विचार केला तर नायकाच्या आयुष्यातील तीन टप्पे 'ती सध्या काय करते' मध्येही दाखवण्यात आले आहेत, पण ती प्रेमकहाणी एकाच व्यक्तिभोवती फिरते. शिवाय या दोघांची तुलना होऊ शकत नाही, कारण दोन्ही चित्रपटांचा विषय, हाताळणी, प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा संदेश आणि प्रादेशिक संदर्भ अगदी विरुद्ध टोकाचे आहेत).

पहिला टप्पा, अर्थातच शाळेतलं प्रेम. निरागस, निरपेक्ष पाहिलं प्रेम, 'मेरी'. शाळेतलं प्रेम हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. शाळेपर्यंत सायकलवर तिचा पाठलाग करणं किंवा तिच्या घराभोवती घिरट्या घालणं, लॅन्डलाईनवर कॉल करून तिचा आवाज ऐकून फोन ठेऊन देणं, तिच्या नेहमीच्या ठरलेल्या जागेवर आधीपासून तिची वाट पाहत उभं राहणं, चिठ्ठ्या लिहिणं (पण कधी द्यायची हिम्मत न होणं) ही सगळी गम्मत प्रत्येकानं अनुभवलेली असल्यामुळे आपण त्या स्टोरीशी स्वतःला रिलेट करू लागतो.

पण पुढे, रांझनातल्या डायलॉगप्रमाणे 'गली के लडको का प्यार अक्सर डॉक्टर और इंजिनियर ले जाते है' टाईप ट्विस्ट येतो आणि पहिल्या प्रेमाची कहाणी तिथेच संपते. जॉर्ज फारसं मनाला लावून न घेता वेळीच सावरतो. बालपणातलं प्रेम कुणी एवढं सिरीयस घेत नाहीच, म्हणा.

आता दुसरं प्रेम. शाळा संपली की कॉलेज ओघानं आलंच. और कॉलेज में प्यार नाही किया तो क्या खाक कॉलेज किया. पण इथे जरासा ट्विस्ट आहे. हे प्रेम झालंय एका टिचरवर. शाळेतला चुलबुला, घाबरट, मिसरूड न फुटलेला जॉर्ज आता रॅगिंग, मारामारी करणारा, रस्ट्रीकेट होणारा, दढीयल आणि राऊडी जॉर्ज झाला आहे. नवीन स्टुडंटची रॅगिंग घेता घेता त्याची ओळख होते, 'मलर'शी, त्याच्या नव्या टिचरशी आणि तो प्रथमदर्शनी तिच्या प्रेमात पडतो. खूप सुंदरपणे, छोट्या छोट्या गोष्टींमधून हळुवारपणे त्यांचे प्रेम फुलताना दाखवलंय, इतकं तरल की ते पाहण्यात मजा आहे सांगण्यात नाही. पण, सगळं काही व्यवस्थित आहे असं वाटत असतानाच, असं काहीतरी घडतं की हे प्रेमही त्याच्यापासून दुरावतं. (हे कारणही सांगत नाही, बघण्यातली मजा जाईल).

सहा-सात वर्षाचा गॅप जातो. मलरला तो आता हळू हळू विसरायचा प्रयत्न करतोय. पण मध्येच एखादी आठवण उफाळून येतेच. जॉर्ज आता एक बेकरी कम कॅफे चालवतोय. पहिल्या दोन प्रेमाप्रमाने तिसरं प्रेमही त्याच्यापर्यंत चालून येतं. परत पहिल्याच गमतीदार भेटेत त्याला 'सेलिन' आवडते. आधीप्रमाणेच याच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाचं फुलपाखरू तरंगू लागतं. शिवाय हेही कळतं की सेलिन म्हणजे त्याचं पहिलं प्रेम मेरीची मैत्रीण. लहानपणी जॉर्जने मेरीसाठी केलेल्या सर्व खटाटोपींची साक्षीदार. दोन तीन भेटीनंतर तो तिला प्रोपोज करायचं ठरवतो आणि कळतं की दुसऱ्याच दिवशी तिची एंगेजमेंट आहे. पुन्हा तेच सगळं होतंय म्हटल्यावर जॉर्ज तिच्यापासून स्वतःला तोडू पाहतो. शेवट काय होतो हे चित्रपट पाहिल्यावरच कळलेलं बरंय, म्हणून सांगत नाही. तसा प्रेडिक्टेड शेवट आहे. मला तरी पर्सनली थोडा वेगळा शेवट अपेक्षित होता. जराशी डिसअपॉइंटमेंट होते, पण ठीक आहे.

जॉर्जच्या रोलमध्ये निविन पौलीने जान आणली आहे. तीन वेगवेगळ्या वयातला आणि वेगवेगळ्या मानसिक पातळीवरचा, फक्त दिसण्यातला नव्हे तर वागण्यातलाही जॉर्ज त्याने नेमका वठवलाय. तिन्ही रोल एकमेकांपेक्षा निराळे राखण्यात तो यशस्वी झालाय. अनुपमा परमेश्वरमने साकारलेली झुपकेदार केसांची मेरी नॉस्टॅलजीक वाटलीये, तो तिच्यामागे सायकलवर फिरताना आपणही तिच्या प्रेमात पडतो.

जॉर्जनंतर कमाल कुणी केली असेल तर ती आहे सई पल्लवीने साकारलेली 'मलर'. केवळ नावातच नाही तर तिच्या रोलमध्ये ही वेगळेपण आणि विविधांगी छटा आहेत. आपण बॉलिवूडवाले जिथे केवळ सौंदर्याच्या जोरावर कास्टिंग करतो, तिथे सई पल्लवी कुठल्याच पातळीवर फिट बसणार नाही अशी वाटेल, पण तीच चित्रपटाचा आत्मा आहे. कारण, जॉर्जने मनापासून प्रेम केलं ते तिच्यावर. लहानपणीचं मेरिवरचं प्रेम हे आकर्षण या कॅटेगिरीतलं म्हणता येईल, जे तो सहजासहजी विसरलाही आणि सेलिनवरचं प्रेम हे कदाचित एक एडजेस्टमेंट किंवा आता कुणाला तरी आपल्या आयुष्यात स्थान दिलं पाहिजे या प्रकारचं वाटतं. त्याने मनापासून प्रेम केलं ते मलरवरच. तिने कॉलेज सोडलं हे कळाल्यावर तडक उठून तिच्या गावी गेला होता तो, ती त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यावर जिवाच्या आकांताने रडला होता तो. तेच त्याचं खरं प्रेम होतं. सईने ज्या आत्मविश्वासाने मलर उभी केलीये त्याला तोड नाही, कदाचित त्यामुळेच तिच्या सौंदर्याच्या पलिकडे जाऊन आपण तिच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतो.

मॅडोनाने साकारलेल्या सेलिनचा रोल छोटा आहे, पण ती क्युट वाटते, समंजस वाटते. मलरनंतर एंट्री झाल्यामुळे कदाचित तिचा रोल झाकोळला गेला असावा, पण तिने पुरेपूर न्याय दिलाय तिच्या रोलला.

जॉर्जच्या या प्रेमकथेमध्ये आपल्याला हरवायला होतं, याचं कारण म्हणजे यात आपण कुठंतरी स्वतःला पाहतो. सायकल घेऊन मेरीच्या मागे धावणारा वेंधळा, कोवळा जॉर्ज असो की कॉलेजमधला मलरला इम्प्रेस करू पाहणारा दाढी वाढवलेला बेफिकीर जॉर्ज असो किंवा परिस्थितीने दगड झालेला, दुधाने पोळल्यामुळे ताकही फुंकून पिणारा प्रगल्भ जॉर्ज असो, त्याच्या प्रत्येक टप्प्यातल्या प्रेमात आपण गुंतत जातो कारण ते कुठे ना कुठे कनेक्ट होत जातं आपल्यालाही.

केरळचा नयनरम्य हिरवागार लॅन्डस्केप चित्रपटात अजूनच रंग भरतो. मल्याळम चित्रपट हा मोहनलाल आणि मामुटी यांच्या कक्षेबाहेर जाऊ शकतो आणि तितक्याच ठामपणे उभा राहू शकतो, याचे उत्तम उदाहरण आहे प्रेमम हा चित्रपट.

जसं प्रेमाला भाषेचं बंधन नसते, तसेच संगीतालाही. प्रेमम थीम म्युझिक फूट टॅपिंग आहेच, शिवाय चित्रपट संपेपर्यंत 'मलरे' आणि 'अळूवा पुळयुदे' (उच्चार चुकण्याची शक्यता आहे) या गाण्याच्या प्रेमात तुम्ही पडता आणि ती वाजत राहतात आपोआप आपल्या डोक्यात, आपल्याच नकळत, चित्रपट संपल्यावरही.

प्रेमावरचा एक वेगळा अनुभव म्हणून हा चित्रपट नक्की पाहण्याजोगा आहे, आपल्याही मनाच्या कुठल्याश्या कप्प्यात लपलेल्या प्रेमाच्या फुलपाखराला हळुवार फुंकर घालावी तसा.

- राज जाधव (२८-०७-२०१७)

Comments

Popular Posts