फिराक


खूप दिवस टाळत होतो बघायचा 'फिराक', कारण गुजरात दंगळीवरचा 'परजानिया' बघून अंतर्बाह्य हललो होतो आणि हाच समान धागा असल्यामुळे फिराकही तसाच अंगावर येईल, असे वाटत होते. सुन्न तर यानेही केले, पण वेगळ्या प्रकारे.

'२००२ ची गुजरात दंगल' या विषयावर आधारीत जरी असला तरी प्रत्यक्षात 'फिराक' मध्ये एकाही फ्रेममध्ये दंगल पेटलेली दाखवलेली नाहीये, हे विशेष. अर्थातच, चित्रपटाचा मूळ विषयच दंगलीनंतर महिन्याभराने स्थानिकांचे बदललेले जीवनमान असल्यामुळे तशी प्रत्यक्ष दंगल दिसण्याचा प्रश्न नव्हताच, तरी फ्लॅशबॅकमध्येही ती न दाखवण्याच्या नंदिता दासच्या निर्णयाचं कौतुक करायला हवं आणि तेही त्या विषयाची दाहकता कुठेही कमी होऊ न देता.

चित्रपटाची सुरुवात मात्र मिनिटभर श्वास रोखायला लावते. नुकताच प्रेतांचा एक ढीग एका मोठ्या खड्डयात दफन करून संपत आलाय. एक तरुण मुस्लिम मुलगा आणि एक वृद्ध चाचा (नासर), अर्थात मुस्लिमच, हे दोघे ते काम करतायेत, इतक्यात एक ट्रक तिथे येतो आणि माती रिकामी करावी तसा प्रेतांना मोकळं करण्यात येतं. हा खच बघून त्यांची हतबलता, त्यात कुणी ओळखीचे सापडल्यावरची वेदना, हिंदू स्त्रीचे प्रेत बघून त्याच्यावर धावून जाताना त्यांची उद्वेगना आणि 'मरे हुवे को क्या मारोगे चाचा' म्हणताना त्यांची असहायता सर्व काही एकत्रच दिसून येते.

पडदाभर चार पाच कथा पुढे सरकत राहतात, मोस्टली समांतर, फक्त त्यातील काही पात्र काही प्रसंगात एकमेकांच्या समोर येतात.

दंग्याच्या दरम्यान नाईलाजाने हिंदूच्या घरात आडोसा घेतल्यानंतर, महिन्याभरात वातावरण जरासं निवळलं आहे म्हणून आपल्या बायकोला, मुनिराला (शहाना गोस्वामी) आणि लहान बाळाला घेऊन, हनिफ (नवाजुद्दीन) स्वतःच्या रिक्षामध्ये आपल्या घरी चालला आहे. पोचल्यावर, अर्थातच ज्याची अपेक्षा होती, तश्याच अवस्थेत घर दिसतंय. अख्खं घर आगीत भस्मसात झालंय. त्याच्या डोक्यात तिडीक गेलीये, असह्य वेदना त्याच्या चेहर्यावर-बोलण्यातून जाणवतायेत. त्याला माहित आहे हे कुणी केले आहे. त्याच्या बायकोच्या हिंदू मैत्रिण, ज्योतीच्या (अमृता सुभाष) मित्रावर त्याचा संशय आहे. तो त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने आता एका पिस्तुलाचा शोध घेतोय, त्याला, त्याच्या पुरता का होईना, पण बदला घ्यायचाय. तिकडे त्याने मुनिराला ज्योतीकडून खबर काढायला सांगितलंय. मुनिराला माहित आहे की मैत्रीण आपल्याशी खोटं बोलणार नाही पण तिच्यावर संशयही येतोय तिला, म्हणून राहून राहून तो एकच प्रश्न विचारात राहते ती मैत्रिणीला. पण हीच मैत्रीण त्याच रात्री एका लग्नात मेहंदी काढण्याचे पाच हजार मिळणार म्हणून मुनिराला घेऊन जाते. तिथे लग्नात आणि रात्री परतताना पोलिसांसमोर ज्योती स्वतःची बिंदी काढून तिला लावायला देते. ही गोष्ट छोटीशीच वाटते, पण फार ठळकपणे जगाची मानसिकता मांडते. तिकडे हनिफ आणि त्याचे मित्र बंदूकपर्यंत पोचतात, सोबत एक गोळीही सापडते पण बंदूक कोण घेऊन जाणार या भांडणात गोळी उडते आणि पोलीस त्यांच्या मागे लागतात. या दरम्यान आपल्या घरापासून दुरावलेला छोटा मोहसीनही तिथेच होरपळत असतो.

समीरचं (संजय सूरी) शॉपही त्या दंग्यात लुटलं गेलंय. तो बायको अनुराधा देसाई (टिस्का चोप्रा) सोबत सध्या तिच्या रिलेटिव्सकडे आणि कायमचा दिल्लीला जायचा विचार करतोय. कारण, दंगेखोरांनी सर्व मुस्लिम दुकानदारांची लिस्ट बनवली आहे, असं ऐकण्यात येतंय आणि तो समीर शेख आहे, समीर रशीद शेख. टिस्का चोप्राचा एक संवाद आहे जिथे ती त्याच्या पॅरेन्ट्सने त्याचे नाव समीर ठेवल्याचे आभार मानते. हा प्रसंगही मुनिराच्या बिंदीसारखा ठळकपणे उठून दिसतो. एका प्रसंगात काही हिंदू जेव्हा देणगी मागायला येतात तेव्हा पावतीसाठी तो स्वतःचं नाव समीर देसाई सांगतो. तो भ्याड आहे हे तो त्यानंतर लगेच कबूलही करतो. पण त्याला हळू हळू लक्षात लक्षात येतं की स्थलांतर हा मार्ग नाहीये. मी पॅक केलेल्या प्रत्येक वस्तूवर तेच नाव आहे आणि ते नाव मी जाईल तिथं माझ्यासोबत येईल. कुठेही ना जाण्याचा निश्चय केल्यानंतर त्या रात्री हायवेवर ते दोघं समीरच्या फेवरेट स्टॉलवर भुर्जीपाव खायला थांबतात. तिथं गस्त घालणाऱ्या पोलिसाला टिस्का, दोघांना मिस्टर & मिसेस देसाई म्हणून ओळख करून देते, त्यावेळेस तो आवर्जून स्वतःचं नाव समीर शेख सांगतो. हा प्रतिकात्मक सिन खर्या अर्थांने दर्शवतो की समीरचा परतीचा प्रवास चालू झाला आहे, स्वतःच्या अस्तित्वाकडे.

खान साहेब (नसिरुद्दीन शाह) स्वतःच्या चष्म्याने दुनिया पाहत असतात. एक क्लासीकल सिंगर असल्यामुळे शब्द आणि सूर यांच्याशीच त्यांचा संबंध राहिला आहे, बंद दाराबाहेर काय चालू आहे याचं गांभीर्य त्यांना नाहीये. याउलट त्यांच्या इथे काम करणारा करीम (रघुवीर यादव) त्यांना वेळोवेळी बाहेर चाललेल्या परिस्थितिची जाणीव करून देत असतो, सावध करत असतो. अशातच एकदा बाहेरून घरी परतत असताना, खांन साहेब रिक्षा थांबवतात आणि खाली उतरून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात, इथेच कुठेतरी एका सुफी संताची मजार होती, ती गेली कुठे? या प्रश्नांवर करीम टाळाटाळ करत त्यांना रिक्षात बसवून घेऊन जातो, पण नंतर त्यांना टीव्हीवर ती तोडल्याचे कळते आणि त्यांच्या डोळ्यावरची पट्टी गाळून पडते. या परीस्थितीत तुमच्या सुरांमुळे काही बदल होईल का? असे करीम विचारतो तेव्हा, हतबल होऊन 'सात सुरों में ये जादू कहा के ये वेहशत रोक सकें' इतकंच म्हणतात. ज्यांनी चित्रपट पाहिला नाहीये त्यांनीही डोळे बंद करून हा संवाद फक्त नसिरुद्दीन शाहच्या आवाजात इमॅजिन करावा, मग त्यातली जादू कळेल.

आरती (दीप्ती नवल) एक टिपिकल हाऊसवाईफ दाखवली आहे. किचनमध्ये स्वतःला कोंडून घेणारी नवऱ्याला घाबरणारी सासऱ्याची सेवा करणारी. पण त्याहीपेक्षा जास्त त्रासदायक आहे तिच्या मनात कुठेतरी लपलेली एक सल. दारापर्यंत मदतीसाठी आलेल्या मुस्लिम मुलीला न वाचविल्याची सल. बऱ्याच वेळा या पापाची शिक्षा म्हणून ती स्वतः लाच चटके देत राहते. शिवाय याची परतफेड म्हणून ती एका मोहसीन नावाच्या मुलाला घरात घेऊन आलीये, मोहन म्हणून.
मोहसीनची कथा हा अजून एक संवेदनशील धागा आहे कथेचा. तो एकटाच भरकटतोय जिवंत नसलेल्या अम्मी अब्बा ला शोधत. त्याचा निरागस चेहरा अनेक प्रश्न विचारतोय, ज्याची उत्तरं कुणाकडेच नाहीयेत. आरतीसोबत तो घरी येतो, पण तिच्या नवर्याने, संजयने (परेश रावल) तिला मारल्याचे बघून तो घाबरून घरातून पळून जातो. संजय पोलिसांशी मांडवली करतोय, त्याच्या भावाला दंगलीदरम्यान केलेल्या गँगरेपच्या केस मधून सोडवण्यासाठी. समीर शेखच्या गाडीशी एक छोटा अपघात झाल्यानंतर त्याच्याकडून पैसे उकळणारा तो, समीरचे शॉप लुटलेल्या चेहऱ्यांपैकी एक चेहरा असतो, हे त्यांना सीसीटीव्ही फुटेज पाहताना कळतं. आपल्या पापाचे प्रायश्चित म्हणून आरती घर सोडून जाते, जाण्यापूर्वी आपल्या नवर्याकडे तिने टाकलेली एक नजर खूप काही बोलून जाते, इतकी कि त्याच्या समोर तोही निशब्द होऊन, मान खाली घालुन तिथून निघून जातो.

या कथा कुठंच संपत नाहीत, चालूच राहतात. चित्रपटातही आणि चित्रपट संपल्यावरही. असंच तर आहे ना?

खरं तर या कथेत नंदिता स्वतःला एखाद्या रोलमध्ये फिट करू शकली असती आणि ऑड वाटलंही नसतं, पण तिने तसं केलं नाही, यासाठीही तिचे धन्यवाद मानायला हवे. कारण प्रत्येकांने आपापले काम चोख बजावले आहे यात शंकाच नाही.

नंदिता दास जितकी संवेदनशील अभिनेत्री आहे तितक्याच सुंदर पद्धतीने तिने हा विषय हाताळला आहे, त्यासाठी तिला खरोखर अ बिग राऊंड ऑफ अप्पलौज.

आता एक पीक मोमेन्ट आहे, त्याबद्दल सांगतो. कारण शेवट यानेच व्हायला हवाय, जसा चित्रपटाचा झाला, तसाच.
शेवटी मोहसीन कॅम्पला पोहोचतो. तिथे अनेक अनोळखी चेहरे त्याला दिसतायेत, काही मुलं खेळतायेत. तो सर्व न्याहळत शेवटी एका जागेवर येऊन स्थिरावतो. शेजारी तोच प्रेतं पुरणारा चाचा आहे. मोहसीन फक्त एकटक बघतोय, काय चालू आहे त्याला काही कळत नाहीये.

शेवट मोहसीनच्या निरागस चेहर्यावर संपतो, मात्र असंख्य प्रश्न सुरुच राहतात...

- राज जाधव (१६-०५-१७)

Comments

Popular Posts