सरकार ३



सरकार ३ वाईट नाहीये.

फक्त ओव्हरडोस झालाय, बच्चनच्या आवाजाचा, हात हलवण्याच्या स्टाईलचा, चहाच्या कपाच्या किंवा खुर्चीच्या दांडीतून, जमिनीवर लोळून केलेल्या कॅमेरावर्कचा, बशीमधून फुर्रर्रर्र फुर्रर्रर्र करत चहा पिण्याचा, "मुझे जो सई लगता है..." या डायलॉगचा, बॅकग्राउंडमध्ये वाजणाऱ्या गोविंदा गोविंदाचा, अंधाऱ्या खोलीत बसून दोन दोन मिनिटं पॉज घेऊन चाललेल्या संवादाचा, मध्ये मध्ये तोडकं मोडकं मराठी ऐकण्याचा आणि एकंदरीत सगळ्या प्रेडीक्टेबल खेळाचा.

नवीन मंडळीत रोनीत रॉय आणि अमित साध चकित करतात. मनोज वाजपेयी ठरवूनही वाईट परफॉर्म करू शकत नाही, त्याचा मिश्किल पण बेरकी देशपांडे जमलाय. यामीचा रोल फुसका बार निघाला आहे. गांधी म्हणून एक कॅरॅक्टर दाखवलंय, जे सुरुवातीला सरकारला भेटतं, ते पहिल्या सरकारच्या जाकिर हुसेनच्या कॅरॅक्टरशी मिळतं जुळतं दाखवलंय. तेच ज्याला सरकार 'मैं ये काम नही करुंगा (पुन्हा दोन मिनिटाचा पॉज) और तुम्हेभी करने नही दुँगा' हे ऐकवतो. हा डायलॉग ऐकल्यावर कपातला राहिलेला घोट घेऊन जाता जाता सरकारच्या पायाला हात लावून जाणाऱ्या जाकिर हुसेनचा चेहरा आणि डोळे अजूनही लक्षात राहतात. ती मजा गांधीच्या रोलमध्ये नाहीये.

जॅकी श्रॉफ आणि त्याची मैत्रीण हे एक न उलगडणारं विनोदी कोडं आहे, त्याचे न कळणारे संवाद तिची त्यावरची प्रश्नमंजुषा आणि परत त्याचं त्यावर डोक्यात न घुसणारं एक्सप्लेनेशन. जॅकीच्या रोलवर नेमकं काय करायचं हे शेवटपर्यंत रामुचं ठरलंच नसावं, असं वाटत राहतं.  जॅकी काय ताकदीचा डॉन प्ले करू शकतो हे पाहायचं असेल तर 'अरण्य कांडम' हा तामिळ सिनेमा बघा, परफेक्ट निओ नॉइर गँगस्टर फिल्म आहे.

राम गोपाळ वर्माला त्याच त्या प्रकारचे सिनेमे बनवण्याचे जे व्यसन लागलंय त्यासाठी एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून त्याची पाटी कोरी करून आणावी, मग कदाचित तो 'सत्या'म 'शिवा'म सुंदरम रामू परत येईल, असं वाटतंय.

- राज जाधव (२८-०५-१७)

Comments

Popular Posts