पिंजर


स्टॉकहोम सिंड्रोम या शब्दाची ओळख बऱ्याच उशिरा, 'हायवे'च्या निमित्ताने झाली. आपल्याला किडनॅप केलेल्या व्यक्तीच्या प्रति प्रेमाची, आपुलकीची भावना निर्माण होणे, म्हणजे स्टॉकहोम सिंड्रोम. याच धर्तीवर 'हायवे' इतक्याच अप्रतिम पद्धतीने हा सिंड्रोम समोर येतो तो 'पिंजर' चित्रपटात.

अमृता प्रीतमच्या याच नावाच्या गाजलेल्या कादंबरीवर, १९४६-४७ च्या काळातील, फाळणीवर आधारित चित्रपट. चंद्रप्रकाश द्विवेदीने अत्यंत मेहनतीने पडद्यावर साकारलेली ही कादंबरी म्हणजे एक अस्वस्थ करणारी कविता वाटते, हळुवार नसात भिनत जाणाऱ्या विषासारखी. विषही असं की ज्याची काही काळानंतर सवय व्हावी, लळा लागावा.

नुकतंच लग्न ठरलेल्या 'पुरो' या हिंदू मुलीला, पूर्वजांवर झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून एक मुस्लिम युवक 'रशीद' उचलून घेऊन जातो. त्याचे धर्मबंधू तिला बाटवून सोडून द्यायच्या विचारात असतात, पण रशीद पहिल्या भेटीतच तिच्या प्रेमात पडतो आणि तिला आपल्यासोबत ठेऊन तिच्यासोबत निकाह पढवायच्या बेतात असतो, तो ते पुढे करतोही, तिच्या इच्छेविरुद्ध. इतर मुस्लिम बांधवांच्या हट्टापायी आणि पूर्वजांचा बदल म्हणून इच्छा नसतानाही त्याने तिला पळवून आणलेले असते, पण ही सल कायम त्याच्या मनात रुतून राहिलेली असते.

आधी गोंधळलेली, नंतर त्याला विनवण्या करणारी, त्याचा तिरस्कार करणारी पुरो, तिच्याही नकळत त्याची विचारपूस करणारी, त्याची काळजी करणारी कधी होऊन जाते, ते आपल्यालाही कळत नाही.

सुरुवातीला नकारात्मक वाटणारा रशीदही हळू हळू त्याच्या अंतर्मनाचे हळवे पडदे उलगडत जातो आणि पुरोने त्याच्या प्रेमात का पडू नये, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारू लागतो. प्रायश्चित म्हणून तो पुरोला तिच्या होऊ घातलेल्या नवऱ्याच्या बहिणीला, म्हणजेच तिच्या भावाच्या बायकोला शोधून भारतात परत पाठवायला मदत करतो. शिवाय तिलाही परत जायची संधी देतो, पण नियतीने तिच्यासाठी निवडलेल्या पर्यायाला, म्हणजेच रशीदला तिला सोडवत नाही. तिनेही भारतात निघून जावं याकरिता रशीद गर्दीत मिसळून जायचा प्रयत्न करतो, पण अस्वस्थ झालेल्या पुरोपुढे हरतो.

हायवेतील 'वीरा आणि महाबीर' आणि पिंजर मधले 'पुरो आणि रशीद' हे एकमेकांशी बऱ्याच अंशी कनेक्ट होतात, त्यांच्यात बरेच समान दुवे आहेत. हायवेमध्ये अखेरीस महाबीरचा दुर्दैवी अंत होतो तर पिंजरमध्ये रशीदला पुरो स्वीकारते हाच काय तो सुखद फरक.

वीरापेक्षा पिरोचं दुःख जास्त जीवघेणं वाटतं कारण रशीद पुरोच्या नकळत तिला पळून घरी जायची संधी देतो तेव्हा पुरोला तिचे आई वडील स्विकारत नाहीत. हे दुःख तिला पचवणं जास्त जड जातं आणि ती, तिच्या घराबाहेर वाट पाहत बसलेल्या रशीदबरोबर परत त्याच्या घरी येते. इतकंच नाही तर नशिबी आलेलं जगणं आनंदाने स्वीकारते, मनात तिच्या न झालेल्या नवऱ्याबद्दल, रामचंदबद्दल एक हळवा कोपरा जपत.

उर्मिलाने साकारलेली आधीची चुलबुली पुरो नंतर भेदरलेली, असहाय्य होते आणि हळूहळू अंती सर्व परिस्थितीचा स्वीकार करते, हे आपल्यालाच आतल्या आत जाळत जातं. एकतर्फी प्रेमात आणि पश्चातापाच्या अग्नीत एकटाच झुरत जाणारा, मनोज वाजपायीने साकारलेला रशीद, जितका शांत दिसतो, त्याच्या मनातली दाहकता तितकीच त्याच्या डोळ्यातून अवतरत राहते.

तीन तासात असंख्य भावनिक गोंधळ निर्माण करत अखेरीस पुरो आणि रशीद एकत्र येतात, तेव्हा आपल्यालाच हायसं वाटतं आणि चित्रपटाअंती स्टॉकहोम सिन्ड्रोम जस्टीफाय होतो.

- राज जाधव (१६-८-२०१७)

Comments

Popular Posts