बँगलोर डेज

नात्यांच्या नाजूक बंधांवर हळुवारपणे आणि नेमके भाष्य करणारे चित्रपट, फारच कमी वेळा जमून येतात. मग ते नाते 'दिल चाहता हैं', 'रंग दे बसंती' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधल्या निखळ मैत्रीचं असो, 'दिल धडकने दो' मधलं आई-वडील-भाऊ-बहीण यांच्यातल्या कॉम्प्लिकेटेड आणि बिझनेस ओरिएंटेड डीलचं असो किंवा 'वेक अप सिद' मधलं स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत मैत्रीतून हळुवार फुलत जाणाऱ्या प्रेमाचं असो. अश्या चित्रपटांत नात्यांच्या परिभाषा वेगवेगळ्या असल्या तरी एका समान धाग्यात गुंफलेले हे सर्व कॅरॅक्टर्स आपल्या मनात कायमचं घर करून राहतात.

असाच एक अनुभव 'बँगलोर डेज' या मल्याळम चित्रपटाच्या निमित्ताने आला.

चित्रपटाची कथा गुंफली आहे ती लहानपण एकत्र व्यतीत केलेल्या आणि एकमेकांशी प्रेमाची नाळ जपलेल्या तीन कझीन्सच्या भोवती, अर्जुन / अज्जू (दलकर सलमान), कृष्णन / कुट्टन (निविन पॉली) आणि दिव्या / कुंजू (नजरिया नझीम).

लहानपणापासूनच बँगलोर ही त्यांची ड्रीम सिटी आहे. तिथल्या फास्ट लाईफने त्यांना भुरळ पाडली आहे. वेगवेगळ्या निमित्ताने ते बँगलोरमध्ये दाखल होतात आणि कथा पुढे सरकते.

कुट्टन आपल्या मातीशी नाळ जपणारा माणूस आहे, त्याला बँगलोरबद्दल कुतूहल असलं तरी त्याला त्याच्या गावाचीही तितकीच ओढ आहे. पण गावातल्या राहणीमानाला कंटाळलेली त्याची आई, गावातून बाहेर पडता यावं म्हणून, त्याला सॉफ्टवेयर इंजिनियर व्हायला भाग पडते. तिच्या रोजच्या कटकटीला कंटाळून त्याचे बाबा आधीच व्यवस्थित चिठ्ठी लिहून, मोकळा श्वास घ्यायला बाहेर पडलेत. त्या परिस्थितीतही ती कुट्टनसोबत उत्साहाने बँगलोरला येते आणि तिथलं राहणीमान आनंदाने आत्मसात करते.

पण कुट्टनला या शहराच्या संस्कृतीचे अप्रूप नाहीये. तो आपले संस्कार, परंपरा आणि मूल्ये जपणारा माणूस. काही काळापुरता तो ओघात वाहवत जाऊन, स्वतःचा मेकओव्हर करून, एका एयरहोस्टेसच्या प्रेमात पडतो पण वेळीच त्यातून सावरतो. एके ठिकाणी गावाकडे राहणारी त्याची आई बँगलोरमध्ये येऊन आधुनिकीकरणाच्या प्रेमात पडते तर त्याच्याच अपार्टमेंटमध्ये राहणारी एक विदेशी तरुणी भारताच्या संस्कृतीला आपलेसे करते, साडी नेसते, भरतनाट्यम शिकते, याचे त्याला अप्रूप वाटते. शेवटी त्याला संस्कारमय मुलगी मिळते की नाही हे चित्रपटातच पाहणे योग्य.

दिव्या एमबीएची स्वप्ने पाहत असताना तिचे आईवडील एका ज्योतिषाच्या सल्ल्याने तिचं लग्न उरकून टाकायचं ठरवतात. शेवटपर्यंत कन्फ्युज असलेली दिव्या अखेरीस लग्नाला होकार देते ते फक्त मुलगा बँगलोरला स्थायिक आहे म्हणून. दास (फहाद फासील) पहिल्या भेटीतच आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल दिव्याला सांगतो, शिवाय हे लग्न फक्त घरच्यांच्या संमतीने करत असल्याचंही. दोघांचं लग्न होतं पण दाससाठी ही फक्त एक औपचारिकता असल्याचं दिव्याला वेळोवेळी जाणवतं, आणि ती नाईलाजाने हळूहळू कुट्टन आणि अज्जूशी पुन्हा रियुनियन करून दासच्या अपरोक्ष धमाल करत असते.

आपला नवरा त्याच्या पहिल्या प्रेमाला विसरू शकला नाहीये, हे कळल्यावर माहेरी गेलेली दिव्या, त्याच्या गतकाळातल्या एका घटनेमुळे पुन्हा त्याच्या आयुष्यात येते, त्याच्या सोबत राहते शिवाय परस्पर तिचं एमबीएचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते. इतकंच नाही तर त्याच्या मनात सलत असलेल्या एका दुःखाचे प्रायश्चित करण्यातही त्याला मदत करते. या सगळ्या प्रोसेसमध्ये तो तिच्या प्रेमात पडला नाही तरच नवल.

आई वडिलांच्या घटस्फोटामुळे लहानपणापासूनच त्यांच्या प्रेमापासून दुरावलेला, शाळा अर्धवट सोडून पळून आलेला, त्याच्या इतर पाहुण्यांमध्ये 'बिघडलेला' हे बिरुद मिरवणारा अर्जुन उर्फ अज्जूचं पात्र सुरुवातीपासूनच बिनधास्त, बेफिकीर आणि लक्ष्यहीन वाटतं. आपल्या कझीन्ससोबत वेडपटपणा करणारा अज्जू मनातून हळवा आणि भावनिक आहे. बाईक रेसिंगची क्रेझ असणाऱ्या अज्जूला काही काळापुरता बॅन लावण्यात आलाय आणि त्यामुळे सध्या तो बाईक रिपेयरिंगची कामे करतोय, त्याच वर्कशॉपमध्ये.

रेडिओ शोच्या माध्यमातून त्याच्यातल्या ध्येयहीन माणसाला जगण्याची उमेद देणाऱ्या आरजे सारा (पार्वती) बद्दल त्याला ओढ आणि कुतूहल वाटतंय. एकदा तिला भेटायला गेल्यावर ती अपंग आहे हे कळल्यावर अस्वस्थ झालेला तो, तिचा पाठलाग करत राहतो आणि अजूनच तिच्या प्रेमात पडतो. दोघांना एकमेकांबद्दल आत्मीयता वाढत असते, हळुवार प्रेम फुलत असतं. पण साराच्या आईची तिच्यासाठीची स्वप्ने वेगळी असतात, तिने तिच्या मुलीसाठी कधीही बेस्टशिवाय इतर कशाचाही विचार केला नाही, असं ती त्याला चांगल्या भाषेत सुनावते. तिच्यासाठी मार्ग मोकळा करून निघून जाताना, ती परदेशात जायच्या वेळेला, अज्जूला खऱ्या प्रेमाची ओळख पटते.

लेखक- दिग्दर्शक अंजली मेननच्या कामात झोया अख्तरची छबी दिसते. दोघींची कामे वेगवेगळी आहेत पण नात्यांना दिलेली ट्रीटमेंट, त्यातली गुंतागुंत आणि सरतेशेवटी ती अलगदपणे सोडवायची हातोटी, हा दोघींच्याही कथेचा मुख्य गाभा आहे.

प्रेममचा राउडी जॉर्ज हाच का?असा प्रश्न पडावा इतका साधा आणि सरळ कुट्टन, निविन पॉलीने साकारला आहे.

दलकरचा अज्जूही अप्रतिम, पहिल्या सिनपासून त्याच्या प्रत्येक पेहरावात आणि डोळ्यात एक बेफिकिरी दिसून येते. साराचा पाठलाग करताना, बसमध्ये त्याने दिलेली प्रेमाची कबुली हा एक मस्त मोमेन्ट आहे चित्रपटातला.

पार्वतीने साकारलेली साराही प्रेमात पडावं अशी. अपंग असली तरी कसलाही न्यूनगंड नसणारी, उलट फुल्ल ऑफ लाईफ भासणारी सारा नक्कीच आवडते. परदेशी जाण्याच्या आधी एका रात्री अज्जूसोबत फिरायला जाताना, तिच्या आईसोबतच्या संवादातली तिची अगतिकता अस्वस्थ करते.

दिव्याच्या भूमिकेला विविध छटा आहेत आणि त्या तिने अप्रतिमरित्या वठवल्या आहेत. गोंधळलेली, चुलबिली, स्वच्छंदी, एकाकी आणी आत्मविश्वासू अश्या वेगवेगळ्या रुपात दिव्या, वेगवेगळ्या प्रसंगात आपल्या समोर येते. लग्नाच्या दहा मिनिटे आधी मला लग्न नाही करायचं म्हणणारी, केवळ बँगलोरला जाता यावं म्हणून लग्नाला तयारी झालेली, नवऱ्याचं प्रेम मिळावं म्हणून मनापासून प्रयत्न करणारी, त्याच्या पहिल्या प्रेमाला विसरण्यासाठी मदत करणारी, शिवाय त्याला त्याच्या भूतकाळातल्या एका घटनेचे प्रायश्चित करायला भाग पाडणारी दिव्या तिने छान साकारली आहे.

दासचा रोल हा, अगदीच सहाय्यक किंवा प्रचंड एकसुरी असल्याचं पूर्वार्धात वाटत राहतं, नेमकं तेव्हाच त्याचा असा भूतकाळ समोर येतो की त्याच्या रोलला कथेत असलेलं महत्व अधोरेखित होतं. सध्याचा निरस दास आणि भूतकाळातला दास यांच्यातलं वेगळेपण स्पष्ट दिसतं.

अंजली मेननने लिहिलेली, नात्यांमध्ये गुंफलेली कथा, सुरुवातीला सरधोपट वाटत असली तरी ती हळुवारपणे मानवी स्वभावाचे वेगवेगळे पदर उलगडत जाते.  त्यात आपलेपणाचा गंध आहे, नात्यांतली ओढ आहे, आपल्या टर्म्सवर जगण्याच्या आणि विनाशर्त उडण्याच्या आकांक्षा आहेत, त्याच्यासाठी चाललेली धडपड आहे आणि या सर्वांच्या मध्ये लागत गेलेला हळुवार प्रेमाचा शोध आहे.

© राज जाधव (२८-०८-२०१७)
#BangaloreDays

Comments

Popular Posts