कागज़ के फूल

प्रेम किती सहज आणि तरल असू शकते, अनेकदा अव्यक्त असूनही, याचा प्रचितीमय प्रवास-

एक मध्यमवयीन नायक, एक तरूण नायिका. तो नावाजलेला दिग्दर्शक, ती एक साधारण तरुणी.

पावसात झालेली त्यांची पहिली भेट, सर्दीत कुड़कुड़नारी-शिंकणारी ती, 'आप अपना गरम कोट साथ क्यों नहीं लायी?' विचारणारा हाफ जेंटलमैन तो, त्यावर 'सर्दी जुकाम मुफ़्त में मिलते हैं, गरम कोट के लिए पैसे लगते है' म्हणत तिच्या परिस्थितीची जाणीव करून देणारी ती, मोठ्या मनाने सर्दीत कुडकुडणाऱ्या अनोळखी तिला स्वतःचा कोट देऊन टैक्सीत निघून जाणारा आणि अश्या कुणा तरुणीला एका पावसाळी संध्याकाळी आपण कोट दिला होता हे सहजपणे विसरून जाणारा तो.

पुढे काही दिवसांनी ती कामानिमित्त बंबईत येते, तेव्हा न विसरता याच्या स्टुडिओत, कोट परत द्यायला पोहोचते आणि अपघाताने कैमर्यात कैद होते. त्याला हवा तो चेहरा त्याला मिळतो आणि इथून सुरु होतो एक अनामिक नात्याचा, आपसुक ऋणानुबंधाचा प्रवास.

छोट्या छोट्या प्रसंगात दोघांची एकमेकांबद्दलची ओढ़ जाणवते. मग पार्टीत त्याने तिला आपला साधेपणा सोडून मेकअप करून आल्याबद्दल हक्काने ओरडणे असो किंवा तिचे पुढच्याच सिनमध्ये आउटडोअरला जाताना अगदी साध्या वेशात त्याच्या गाडीत त्याच्या शेजारी येऊन बसणे असो, त्याचा अपघात झाल्यावर तिने त्याची घेतलेली काळजी असो किंवा त्याला, ती एकटी असल्याची कल्पना असूनही, कोणा तरी प्रिय व्यक्तिसाठी स्वेटर विणत आहे हे भासवणारी आणि त्याच्या मुलीने त्याच्या आयुष्यातून निघून जा असे सांगितल्यावर तो स्वेटर त्याला देऊन, ती प्रिय व्यक्ती तूच होतास हे मुकेपणाने दर्शवणारी आणि हसत हसत त्याच्या आयुष्यातून जाणारी ती असो.

इकडे, आधी बायको, नंतर मुलगी आणि आता याही निरपेक्ष नात्यापासून दुरावलेला, त्यापाठोपाठ व्यावसायिक अपयाशाने ग्रासलेला आणि व्यसनाच्या अधिन झालेला तो आणि तिकडे एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली आणि केवळ त्याच्या मुलीला दिलेला शब्द पाळण्यासाठी सर्व चकाचौंदवाली जिंदगी सोडून एका शाळेत शिकवणारी ती.

नियती पुन्हा दोघांना एकमेकांसमोर आणू पाहते. केवळ याला पुन्हा त्याची दिग्दर्शकाची खुर्ची परत मिळावी आणि तो या निराशेच्या गर्ततेतून बाहेर यावा यासाठी ती पुन्हा चित्रपट स्वीकारते, आणि त्याला दिग्दर्शनाची विनंती करते. 'बिछड़े सभी बारी बारी' म्हणणारा तो, आजवर सर्व काही हरवतच आलोय आणि आता बाकी राहिलाय तो केवळ 'आत्मसन्मान', तू म्हणशील तर तोही पणाला लावायला तयार आहे, असे म्हणत तिच्यासमोरच प्रश्नचिन्ह उभे करतो.

तो ती खुर्ची लाथाडतो खरं, परंतू त्याहून मोठी शोकांतिका ही की त्याचा अखेरचा श्वासही तो याच खुर्चीवर घेतो. अजून एक शोकांतिका अशी की, चित्रपटात दाखवल्याप्रमाणे प्रदर्शनानंतरही याला नाकारण्यात आले आणि नंतर काही वर्षांनंतर सुबुद्धी सुचल्यानंतर त्याला 'कल्ट क्लासिक' वगैरे म्हणून कौतुकसुमनांचा वर्षाव करण्यात आला. असो..

चित्रपट अनेक बाजूंनी उजवा असला, तरी एक तरल प्रेमकथा हा या चित्रपटाचा गाभा आहे. पूर्ण चित्रपट त्या दोघांच्या तरल, अव्यक्त तरीही दोघांना परिचित अशा प्रेमाभोवती अत्यंत अलगदपणे गुंफला आहे. आणि विशेष भावलेली गोष्ट म्हणजे, अख्ख्या १४८ मिनिटांत एकदाही, दोघांपैकी एकानेही दुसऱ्यासमोर प्रेम व्यक्त केले नाहीये आणि केले नाहिये असे म्हणताही येणार नाही.

एक संवाद बऱ्याच वेळा चित्रपटात येतो आणि तो प्रत्येकवेळी आधीहून गडद होत जातो..,"हमने हमेशा एक दूसरे को समझा हैं..!"

जसा जसा चित्रपट संपत येतो, ह्या संवादाचे अनेकार्थ समजत जातात.

खरंच प्रेम म्हणजे वेगळे ते काय! एकमेकांना समजून घेणेच. नाही का?

प्रेमाचा खुप वेगळा अर्थ समजावणारा हा चित्रपट डोळ्यात, मनात आणि हृदयातल्या एखाद्या कप्प्यात, (मागच्या बरं का) ठेवण्यासारखा नक्कीच आहे.

- राज जाधव (२५-०३-२०१५)

Comments

Popular Posts