गोल्डी आनंद, दि ओरिजिनल श्रीराम राघवन


लहानपणी ज्या ठराविक गोष्टी आपल्यावर प्रभाव पाडतात, त्या आपण आयुष्यभरासाठी एक ठेव म्हणून जपत असतो आणि कुठेतरी त्या अप्लाय करण्याचा प्रयत्न करत असतो.

श्रीराम राघवन साधारण १०-१२ वर्षांचा असताना त्याला 'जॉनी मेरा नाम' या सिनेमाने वेड लावलं (इतकं की पहिल्यांदा तो चित्रपट त्याने अल्पना टॉकीज पुणे इथे संध्याकाळी ६ वाजता पाहिला असल्याचे त्याला स्पष्ट आठवते). अर्थात ते वय टेक्निकल आस्पेक्ट्स कळण्याचं नव्हतं, अमुक एखादा शॉट कसा घेतला आहे किंवा स्क्रिनप्लेमध्ये काय करामत केली आहे वगैरे तेव्हा कळत नव्हतं. तरीही हा चित्रपट त्याच्या मनात कायम घर करून राहिला.

त्याचाच परिणाम असावा, पुढे त्याने त्याच्या चित्रपटाचे नाव 'जॉनी गद्दार' ठेवले. निल नितीन मुकेशच्या वडिलांनी, नितीन मुकेशनी राघवनला हे नाव काहीसे बी ग्रेड वाटत असल्याचे सांगितले. ज्यावर राघवनचं 'ते तसंच वाटायला हवंय' असं चमत्कारिक उत्तर मिळालं. याशिवाय सर्वात महत्वाचं कारण म्हणजे राघवनच्या डोक्यात मुरलेल्या 'जॉनी मेरा नाम'च्या आठवणी, त्यामुळे तो या नावासाठी आग्रही होता. अर्थात पुढे नितीन मुकेशने 'यात जॉनी नावाचं पात्रही नाहीये' असाही युक्तिवाद केला, जे राघवनला त्रास देणारं होतं. मग हे नाव जस्टीफाय करण्यासाठी त्याने एक प्रसंग दाखवला जिथे निल नितीन मुकेश स्वतःचं नाव 'जॉनी' सांगतो. राघवनने हा सगळा अट्टाहास ज्या माणसासाठी केला त्या मास्टरमाईंड गोल्डी आनंदचा आज जन्मदिन.

अनुराग कश्यपनेही स्वतः 'तिसरी मंजिल' हा बॉम्बे वेल्वेटसाठी एक मोठा रेफरन्स पॉईंट असल्याचे कबूल केले होते. राघवन आणि कश्यपप्रमाणेच, इम्तियाज अली,  विशाल भारद्वाज, फरहान-झोया अख्तर, सुधीर मिश्रा यांनीही विजय आनंदच्या काळाच्या पुढच्या व्हिजनला सलाम केला आहे. भन्साळी आणि विधु चोप्राच्या सॉंग शॉट सिक्वेन्समध्ये गोल्डीच्या स्टाईलचे धागेदोरे सापडतील. कुतुबमिनारमध्ये शूट झालेलं 'दिल का भंवर' कोण विसरू शकेल? तिसरी मंजिलमधील 'ओ हसीना जुल्फोवाली', ब्लॅकमेलमधील 'पल पल दिल के पास', गाईडचं 'कांटो से खिंच के ये आंचल', ज्वेल थिफचं 'होंठो में ऐसी बात' ही क्लासिक्स पहा. त्याच्या गाण्यातही स्क्रिनप्ले असायचा, असं म्हटलं जायचं. 'गाईड' ही कल्ट फिल्म तर मेटाफर्स आणि सिम्बॉलीजमची कार्यशाळा मानतात.

पण ज्या गोष्टीसाठी तो सर्वात जास्त ओळखला गेला तो गोल्डीचा फेवरीट थ्रिलर जॉनर हा बऱ्याच जणांचा अभ्यासाचा विषय आहे. पन्नास, साठ आणि सत्तरच्या दशकात त्याने थ्रिलरला वेगळाच आयाम दिला. त्याच्या 'ज्वेल थिफ', 'तिसरी मंजिल', 'जॉनी मेरा नाम', 'ब्लॅकमेल' या चित्रपटांना आजही कल्ट मानले जाते. ज्वेल थिफ आणि तिसरी मंजिल यामधील शॉट टेकिंग, स्टोरीटेलिंगची पद्धत, खिळवून ठेवणाऱ्या क्लुप्त्या आणि सावल्यांशी खेळण्याची त्याची टेकनिक हे सर्व त्या काळाच्या मानाने खुप पुढारलेले होते. सस्पेन्स-थ्रिलर या कॅटेगरीइतकीच इतर जॉनरही त्याने लिलया पेलले, गाईड आणि तेरे मेरे सपने ही त्यातल्या त्यात महत्वाची उदाहरणे.

गोल्डीचा आज जन्मदिन, आज 'ज्वेल थिफ' किंवा 'जॉनी मेरा नाम' पाहून साजरा करायची इच्छा आहे. गोल्डी आज असता तर या टेक्निकली पुढारलेल्या काळात काय जादू करु शकला असता हा केवळ विचारच केलेला बरा. तसा तो नाहीये, असेही म्हणू शकत नाही, त्याच्या कलाकृतीतून तो अजरामर राहील.

'आनंद मरते नही' हे गोल्डीसाठीही लागू पडावं बहुदा!

- राज जाधव (२२-०१-२०१९)

Comments