झोया फॅक्टर


झोया अख्तर!

या नावाला पटकथालेखक-गीतकार जावेद अख्तर यांची कन्या किंवा वर्साटाईल फरहान अख्तर याची बहीण, या ओळखीची आवश्यकता नाहीये. फारसा चालला नसला, तरीही नवोदित दिग्दर्शक म्हणून 'लक बाय चान्स' एक चांगला अटेम्प्ट होता. लक बाय चान्सला प्रेक्षकांनी नाकारल्यानंतर आलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'बॉम्बे टॉकीज' आणि 'दिल धडकने दो' या चित्रपटांनी समीक्षक आणि बॉक्स ऑफिस अश्या दोन्ही पातळीवर झोयाच्या नावाची दखल घेतली गेल्याने ती प्रॉमिसिंग दिग्दर्शकांच्या यादीत जाऊन बसली होतीच, त्यानंतर आलेल्या 'लस्ट स्टोरीज' मधल्या कामाचंही कौतुक झालं.

झोया अख्तरच्या पूर्ण लांबीच्या चित्रपटांची खासियत म्हणजे, ते कॅरेक्टर ओरिएंटेड असल्याने प्रत्येक पात्राला स्वतःचं अस्तित्व आणि महत्व पटवून द्यायला पूर्ण वाव असतो, ज्यातून कथेचे अनेक पदर उलगडत जातात. शिवाय ही गोष्ट अगदी कथा आणि संवाद लिहिण्यापासून पक्की गृहीत धरून पात्रे डिफाईन केली जातात. सहलेखक रीमा कागती आणि झोया यांची ऑफस्क्रिप्ट बॉंडींग जितकी पक्की आहे तितकीच ऑनस्क्रिप्ट केमिस्ट्रीही अफाट आहे हे या दोघींनी लिहिलेल्या, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि त्यानंतर 'दिल धडकने दो', याबाबतीतही प्रकर्षाने पहायला मिळाली.

पडद्यावर सोफीस्टिकेटेड आणि श्रीमंत पात्रे उभी करण्यात झोयाचा हातखंडा. इतका की तिचा चित्रपट म्हटला की दोन चार हाय प्रोफाईल बिझनेस फॅमिलीज, त्यांना शोभतील असे त्यांचे स्केंडल्स, नात्यातले इम्पर्फेक्शन्स, मेल डोमीनेटेड सोसायटी विरुद्ध लढणाऱ्या स्त्री कॅरेक्टर्स हे आवर्जून आलंच. पण हे करता करता ती याच साच्यात अडकून राहते की काय असे वाटत होते. पण...

पण गली बॉय पाहिला आणि थक्क व्हायला झालं. तिच्या शैलीपेक्षा पूर्ण वेगळा विषय, वेगळी पार्श्वभूमी आणि पात्रेही. तरीही त्यात झोया फॅक्टर सापडतोच.

लक बाय चान्समध्ये फिल्म इंडस्ट्रीचे स्वप्न बाळगणारा फरहान, ७० एमएम च्या पडद्यावर झळकण्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो. तसेच, इथे गल्लीतल्या छोट्याश्या घरात रणवीरही आपल्या स्वप्नांच्या जवळपास पोहोचताना, 'मला काय करायचं आहे, हे मी ठरवलंय' असं ठाम सांगून बापाच्या तोंडावर पडदा सरकावतो, तेव्हा हे दोघेही एकाच मुक्कामाचे प्रवासी वाटतात. लक बाय चान्समध्ये फिल्म इंडस्ट्रीची हकीकत प्रभावीपणे मांडणारी झोया, गली बॉयमध्ये रॅपर्सवर भाष्य करताना दिसली, तीही तितक्याच परिणामकारकपणे.

जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये अर्जुन, कबीर आणि इम्रान या पात्रांनी ज्याप्रमाणे मैत्रीची नवी व्याख्या शिकवली तितकीच मुराद, मोईन आणि एमसी शेरनेही. दिल धडकने दो मधील अनिल-शेफाली-रणवीर-प्रियांका यांच्या नात्यातले इंफर्फेक्शन्स इथे विजय राज-रणवीर-अमृता सुभाष यांच्यातही आहेत. तिकडे, स्वतःचा बिझनेस सांभाळत मेल डोमीनेटेड सोसायटीशी लढणारी प्रियांका चोप्रा आणि इथे वडिलांसोबत क्लिनिक सांभाळत बुरखा फाडून घराबाहेर पडून मोकळा श्वास घेऊ पाहणारी आलिया भट यात तत्वतः काहीच फरक नाहीये, हे जाणवले आणि झोयाचं खूप कौतुक वाटलं. कुणी इतक्या प्रामाणिकपणे काम केलं की पडद्यावर सोनंच उमटतं. गली बॉय पाहणे हा एक असाच अनुभव आहे, अविरत स्वप्नांचा प्रवास आहे, ज्याला आपण प्रत्येक जण रिलेट करू शकतो.

गली बॉयचा नशा उतरण्यापूर्वीच झोया आणि रिमाच्या 'मेड इन हेवन' चा ट्रेलर आला होता. ही सिरीज आणि यातली बरीचशी पात्रे पुन्हा एकदा सोफीस्टिकेटेड हाय प्रोफाईल क्राऊडच्या मार्गे जाणारी होती, तरीही ही सिरीज आपल्याला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन सोडते, विचार करायला भाग पाडते. यातली पात्रे कमालीची ब्रेव्ह आणि प्रचंड ताकदीची आहेत, परफेक्ट असावीत हा अट्टाहास सोडून. या सिरीजचा आवाका प्रचंड मोठा आहे, त्यावर काही लिहिण्यापेक्षा तो अनुभव घ्यायला हवा, असं वाटतं. कारण ती पात्रं इथे समजावून सांगण्यापेक्षा ती तुम्ही मनात रुतवून घ्यावीत, त्यातच त्याची खरी मजा आहे.

यावर्षीच्या गली बॉय आणि मेड इन हेवननंतर झोया पुढे काय करणार आहे याची आता उत्सुकता लागून राहिली आहे.

- राज जाधव (२५-०३-२०१९) 

Comments