गँग्स ऑफ नॉर्थ चेन्नई


Vetri Maaran ची फिल्मोग्राफी थक्क करणारी आहे. विषयाला वेगळ्या प्रकारे हाताळण्याची त्याची पद्धत 'विसरानाई' आणि त्याआधीच्या चित्रपटात दिसून येते. त्याच धर्तीवर 'वाडा चेन्नई' देखील दाखल झाला आहे.

हा चित्रपट तीन भागांत प्रदर्शित होणारा पहिला तामिळ चित्रपट असल्याने देखील त्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. अडीच तासांचे एक एक भाग गृहीत धरता, त्या विषयाची व्याप्ती एखाद्या वेब सिरीजइतकी भव्य असणार यात शंकाच नाही. पण, इथेच दिग्दर्शकाचा खरा कस लागतो. जे दाखवायचे आहे ते तीन भागांत येणार म्हटल्यावर, कोणत्या गोष्टी कधी आणि कश्या प्रकारे रिविल करायच्या, जेणेकरून त्याचा जबरदस्त इम्पॅक्ट पडेल, हे तितकेच गरजेचे असते. यासाठी बॅकग्राउंड स्कोर आणि एडिटिंग हे सगळ्यात महत्वाचे टूल्स  ठरतात आणि काही प्रमाणात हा चित्रपट ते त्याच प्रभावाने दाखवण्यात सफल होतोही. फ्लॅशबॅक्स, बॅकस्टोरीज आणि मध्यंतरापूर्वी येणारा शॉक हाही याच कॅटेगरीमध्ये मोडेल. त्यामुळे किती बारकाईने प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करावा लागत असेल, हा केवळ विचार केलेलाच बरा.

त्यालाच अनुसरून हा पहिला भाग संपूर्ण कहाणीची एक प्रोलाँग्ड प्रस्तावना म्हणता येईल. चित्रपटात अनेक पात्रे आहेत आणि सर्व एकमेकांशी जोडलेली आहेत. प्रत्येकाचे बॅकग्राउंड, प्रत्येकाच्या कहाण्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या वागण्याला, स्वतःचं एक लॉजिक आहे, मग ते स्वतःच्या फायद्यासाठी असो, कृतज्ञतेच्या अथवा लालसेच्या भावनेने असो किंवा बदल्यापोटी असो.

प्रत्येक पात्राचा ग्राफ वेगळा असल्याने, तो दाखवण्यासाठी आणि प्रत्येक पात्राला दुसऱ्या पात्राशी, त्याच्या मोटिव्हनुसार कनेक्ट करण्याच्या हेतूने चित्रपट बराच वेळ घेतो. त्यामुळेच चित्रपट सुरुवातीला स्लो पेस्ड वाटतो. थोडासा पेशन्स दाखवावा लागतो. मूळ कथानक तीन भागात असल्याने, सर्व पात्रे, त्यांचे बॅकग्राउंड, परस्पर वाद, कुरघोडी, माईंड गेम्स हे सगळं हळूहळू उलगडत जाताना मजा येते. अखेरीस चित्रपट ज्या हाय पॉईंटला संपतो, तिथे खरे कथानक सुरू होते. त्यावरून दुसरा भाग नक्कीच रंजक असेल याची खात्री पटते. पण प्रस्तावनेपोटी हा पहिला भाग, समजून घेऊन पाहणे गरजेचे ठरेल.

- राज जाधव (०५-१२-२०१८)

Comments