निःशब्द


माणूस आयुष्याच्या दोन महत्त्वाच्या टप्प्यावर कुणाची तरी साथ शोधत असतो, एक नुकतेच तारुण्यात पदार्पण केल्यावर आणि दुसऱ्यांदा आयुष्याच्या उत्तरार्धात साठी ओलांडल्यानंतर. पण नेमक्या याच वयातील दोन व्यक्तींना आपसात प्रेम झालं तर?

विषय वेगळा असल्याने आणि अमिताभमुळे रामुचा निःशब्द पाहिला. निःशब्द न होता, उलट अनेक प्रश्न पडले.

यातही साठीच्या आसपास असणाऱ्या अमिताभला स्वतःच्या मुलीच्या १८ वर्षाच्या मैत्रिणीसोबत प्रेम होते. हा मुळातच आपल्या सो कॉल्ड भारतीय संस्कृतीला न शोभणारा विषय. चित्रपटाचा विषय बोल्ड असला तरी कंविनसिंग वाटत नाही, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जिया खानचा अपरिपक्व, बालिश अभिनय आणि मनाला न भिडणारी लव्हस्टोरी. जियाचे प्रेम, साधारण त्या वयात होतं त्याप्रमाणे अल्लड वाटतं, रादर ते प्रेम म्हणताच येणार नाही, आकर्षणच. याचा खूप मोठा फटका या नाजूक विषयाच्या चित्रपटाला बसतो, त्यामुळे या दोघांचे प्रेम, हे विशुद्ध प्रेम न वाटता एखादे प्रकरण वाटते, जे इथे अजिबात अपेक्षित नव्हते. नेमके इथेच दिल चाहता हैं बाजी मारतो, त्यातील सिडचं तारा जैस्वालसोबतचे आणि त्याने प्रेमाची कबुली दिलेले प्रसंग आठवा, तिथे आपण सहज कंविन्स होऊन जातो. त्या प्रेमाचा फील इथे अजिबात येत नाही.

बच्चन शेवटी बच्चन आहे, तो त्याचे काम चोख निभावतो. सुरुवातीचा गोंधळलेला, नंतर जियाकडे आकर्षित होणारा, काही काळ तोल ढासळला तरीही योग्य वेळी सावरणारा, तरीही प्रेमात आकंठ बुडालेला, हतबल माणूस त्याने नेमका निभावलाय.

अश्या चित्रपटात शेवट काय असावा ही उत्सुकता लागून राहते. केवळ १ तास ४४ मिनिटांचा चित्रपट असूनही, अगदीच आवर्जून पहावा असा नाहीये, तरीही स्पोईलर नको म्हणून इथे सांगत नाही.

- राज जाधव (०९-०६-२०१८)

Comments