नात्यांत मुरलेल्या मुरांब्याची गोष्ट


खूप दिवसाचा पहायचा राहिलेला 'मुरांबा' पाहिला. इतक्या दिवसानंतर खरं तर जास्त मुरायला हवा होता, पण तसं वाटलं नाही.

सिनेमा छानच आहे. अमेय-मिथिलाचं कामही उत्तम. एका ब्रेकअपची गोष्ट सांगताना आलोक (अमेय वाघ) आणि इंदू (मिथिला पालकर)चे फ्लॅशबॅक्स, त्या दोघांनी मांडलेल्या बाजू, इंदूचा आयुष्याच्या दिशेने प्रॅक्टिकल अप्रोच, समजूतदारपणा, आलोकच्या जगाला तोंड न देण्याबद्दलच्या स्वभावाबद्दल नाराजी, याउलट आलोकचा गोल्ड मेडलिस्ट असूनही मनातला न्यूनगंड, भीती, बालिश, दिशाहीन, बेफिकीर असणं आणि टिपिकल पुरुषी स्वभाव, इंदूला आपल्यासाठी वेळ नसल्याचे केलेले आरोप, यामुळे त्यांच्यात होणारे वाद, या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येत राहतात आणि आपण दोघांना जज करत राहतो, नेमकं कुणाचं चुकलं, याचा विचार करत. शेवटी प्रश्न सुटतात. पण यासाठी एका माणसाची खूप मदत होते.

या सगळ्यात मित्रासारखा जो धावून येतो, तो अलोकचा बाबा (सचिन खेडेकर). सचिन खेडेकरने ज्या सफाईने अमेयचा बाबा उभा केला आहे त्याला तोड नाही. शांत वावरणारा, चिडचिड न करणारा, मुलाला मानसिकरित्या सावरणारा, कधीही संयम न ढळू देणारा आणि तरीही त्याला योग्य वेळी, योग्य पद्धतीने समज देऊन भानावर आणणारा बाबा लक्षात राहणारा आहे. बाबाला साथ देणारी आई (चिन्मयी सुमित) ही अगदीच टिपिकल आई दाखवलीये. आपल्या मुलाने कितीही चिडचिड केली तरी न रागावणारी, उलटे बोलले तरीही परत हसत हसत त्याला चहा प्यायला बोलावणारी ही आपल्या घरात दिसते अगदी तशीच आई तिने उभी केली आहे. ती कुठलेच दुःख, अपमान मनात साठवून ठेवत नाही, मोठया मनाने मुलांना माफ करते, माफी मागितलेली नसतानासुद्धा.

'मुरांबा' हा नक्कीच गोड अनुभव आहे, पण चित्रपट खूपच प्रेडिक्टेबल होता, ब्रेकअपचं कारण काय आहे आणि त्याचा शेवट कुठे होणार, हे लवकरच लक्षात येतं.  ट्रीटमेंट, अर्थात खुपच वेगळी आणि फ्रेश आहे, पण विषयाच्या मनाने उत्तरार्धात सिनेमा जरा ताणल्यासारखा आणि संथ वाटला.

एकंदर नवीन अनुभव म्हणून एकदा पाहण्यासारखा आहे. अमेय-मिथिला पेक्षाही सचिन खेडेकरचा प्रसन्न वावर याने सिनेमा जास्त खुलला.

- राज जाधव (२४-०४-२०१८)

Comments