सोनू के टीटू की स्वीटी


सिनेमा चांगला की वाईट, हे कशावरून ठरवावं?

कथा, पटकथा, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, डायरेक्शन, या सर्व आस्पेक्ट्सच्या टिपिकल पुस्तकी व्याख्यात बसत असेल तरच चांगला, असे काही आहे का?

असेलही, पण हे प्रत्येक चित्रपटाला लागू होतेच असे नाही. काही गोड अपवाद असतात, 'सोनू के टीटू की स्वीटी', हा असाच एक सिनेमा आहे.

अश्या सिनेमांना सो कॉल्ड सिनेमॅटिक निकष लावावेतच का? कधी कधी या सगळ्यांच्या बाहेर जाऊन हलकफूलका, तुफान धमाल अनुभव देणारा, नॉस्टॅलजीक करणारा एखादा सिनेमा हे सारे ठोकताळे मोडतो.

चित्रपट का पहावा:

१. सर्वात पहिले कारण, आलोकनाथ.

आश्चर्य वाटेल, पण यात त्याने साकारलेल्या 'घसीटे' ने धमाल आणली आहे. आजवर संस्कारी आणि साईड रोल्स करत या माणसाचे करियर संपून जायची वेळ यावी आणि त्यानंतर हा मास्टरस्ट्रोक यावा. ही शोकांतिका म्हणावी की सरप्राईज पैकेज? बहोत देर आये, पर दुरुस्त आये. बेफिकीर, बिनधास्त सोफ्यावर लोळत दारू, चिकन फस्त करत, त्याच्या साथीदारासोबत, लालूसोबत (विरेंद्र सक्सेना) सॉलिड वन लायनर्स, फिलॉसॉफीकल टाकणे, किंवा एखादी मस्त शिवी मनापासून हासडणे हे त्याने इतक्या कंविन्सिंगली केले आहे की हे कास्टिंग अगदी परफेक्ट वाटते. घसीटे आणि लालू यांची नॅचरल केमिस्ट्री अफाट जमून आली आहे.

२. कार्तिक आर्यन

कार्तिक ने साकारलेला सोनू, प्यार का पंचनामाच्याच रोलचं एक्सटेन्शन वाटावा असा आहे. कार्तिक आर्यन, त्याची सोनूगिरी, मित्र टिटूला मुलींच्या तावडीतून वाचवण्यासाठी त्याने केलेल्या करामती मजा आणतात. कॉमेडीसोबतच त्याचा मित्रासोबतचा इमोशनल कनेक्टही नॉस्टॅलजीक करतो. 

३. नुसरत बरुचा

नुसरत गोड दिसली तर आहेच, पण त्याच बरोबर कार्तिकला पुरूनदेखील उरली आहे. त्या दोघांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार चित्रपटाला अधिकच मनोरंजक करतात. शेवट काय होतो, याचीही उत्सुकता लागून राहते.

४. सपोर्टींग कॅरॅक्टर्स

ही एक खूप मोठी जमेची बाजू आहे चित्रपटाची. एका टिपिकल हॅपी गो लकी दिल्ली बेस्ड पंजाबी फॅमिलीसारखा, सोनू आणि टीटूच्या घरातला गोतावळा, त्यांचे स्वभाव, चटपटीत संवाद चित्रपटाची लज्जत अजून वाढवतात. सनी सिंगचा टीटु हा काहीसा बॅकफूटवर वाटावा असा असला, तरी एक महत्वाचा रोल आहे. गर्लफ्रेंडच्या आहारी गेलेला, दरवेळी रडगाणे गात सोनूकडे येणारा, कन्फ्युज्ड, टिपिकल इमोशनल फूल त्याने मस्त जमवला आहे. अलोकनाथचे पात्र सपोर्टींग असूनही ठळकपणे वेगळे जाणवते. त्यासोबत विरेंद्र सक्सेनाचा लालूही अप्रतिम. संगीतदेखील एक सपोर्टींग रोल प्ले करते असे म्हणायला हरकत नाही, काही पेपी नंबर्स चित्रपटाच्या ओघात ऐकणीय वाटतात.

५. लव रंजन टच

लास्ट बट नॉट दि लिस्ट, टिपिकल लव रंजन फिल्म. लव रंजनने, गर्लफ्रेंडपीडित पुरुष, त्यांचे दैनंदिन प्रॉब्लेम्स, पुरुषांना अपील होतील असे संवाद, हसतखेळत त्यावरील उपाय, मांडलेले फंडे या अनएक्सप्लॉर्ड विषयात, प्रेक्षकांची नस पकडली आहे.

का पाहू नये:

आयुष्यातील हलकेफुलके आनंद देणारे चित्रपटही तुम्ही जर सिनेमॅटिक फुटपट्ट्या घेऊन मोजणार असाल तर अजिबात पाहू नका.

बाकी जाता जाता, घसीटेरामचं एक तत्वज्ञान, जे मनापासून पटले आणि इथून पुढे शंभर टक्के फॉलो करेन-

'मेरा एक फंडा हैं.. *** आदमी को कभी मत बताओ की वो *** हैं'.

हे आत्मसात केलं तर अर्धे प्रॉब्लेम उद्भवणारच नाहीत.

- राज जाधव (१४-०३-२०१८)


Comments