लेना होगा जनम हमें कई कई बार..


सिच्युएशनप्रमाणे जेव्हा एखाद्या गाण्याचं लेखन केलं जातं, तेव्हा ते चित्रपटात कुठे वापरण्यात यावं, याबद्दल दिग्दर्शक ठाम असू शकतो, पण त्याच बरोबर ते कसं चित्रित व्हावं याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे असते.

'फुलों के रंग से' हे अतीव सुंदर गाणं नीरज यांनी लिहिले, तितकंच मेलडीयसली ते संगीतबद्ध केले एस. डी. बर्मन आणि आपल्या खासियतप्रमाणे जीव ओतून किशोरकुमारने गायलंही.

'प्रेम पुजारी' चालला नाही, पण गाणी अजूनही लोकप्रिय आहेत. पण हे गाणं ऐकताना जितकं श्रवणीय आहे, वेड लावतं, तितकंच ते पडद्यावर पाहताना भ्रमनिरास होतो. याबद्दलची नाराजगी खुद्द एस डी बर्मन यांनी बोलून दाखवल्याचे संदर्भ त्यांच्या 'सुनो मेरे बंधू रे' या पुस्तकात आढळतात. या तिघांनी केलेल्या अफाट कामाची, पिच्चराईज करताना देव आनंदने क्षणार्धात माती केली, हे आपल्यालाही पाहताना लक्षात येते.

आर डी बर्मनची तर अशी अनेक गाणी सापडतील. एक जे प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे 'जीवा' या टुकार चित्रपटातील गाणे. गुलजार आणि आरडी यांच्या अनेक अजरामर गाण्यांपैकी एक असे, 'रोज रोज आँखो तले'. इतकं तरल आणि नितांतसुंदर गाणं, त्या धबधब्यासारखं दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र मंदाकिनी आणि लिटरली 'नशील्या' डोळ्यांचा संजूबाबा यावर वाया घालवण्यात आलंय, असं मलातरी नेहमी वाटतं. गुलजारने ज्या नजाकतीत 'जब से तुम्हारे नाम मी मिसरी होंठ लगाई हैं' किंवा 'बेचारे से कुछ ख्वाबोकी नींद उडा दी हैं' लिहिलंय, ज्या आत्मीयतेने आशा-अमितने ते गायलंय, त्यातली आर्तता एक टक्काही पडद्यावर उतरत नाही.

सध्या, तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे, पिच्चरायझेशन वाईट होण्याचा धोका काही प्रमाणात टळला असला तरी एखाद्या सुंदर कम्पोसिशनची ऑनस्क्रीन वाट कशी लावावी याची प्रचिती काही वर्षांपूर्वीच्या 'बोल न हलके हलके' या गाण्यात आलीच. म्हणजे नुसतेच तंत्रज्ञान सुधारून उपयोग नाही, तर आपण पडदयावर काय दाखवतोय याचेही भान हवे. शाद अलीने 'झूम बराबर झूम' या रद्दड चित्रपटात या गाण्याचं पिच्चरायझेशन शक्य तेवढ्या वाईट प्रकारे केले आहे, की ते पहायचे टाळतोच.

अशी लिस्ट काढायला बसलोच तर अजूनच वाढेल.

सध्याचे चित्रपट पाहता असे लक्षात येते की काही ठराविक कालावधीनंतर एक ट्रेंड येतो आणि जातो. मागे, आयटम सोंग्स (सॉरी साँग्स) ची क्रेझ आली होती, आता जुनी गाणी, एडिशनल लिरिक्स लिहून रिक्रियेट करायची (आणि ओरिजिनलची चव बिघडवयाची). गायकांचाही एक ट्रेंड येऊन गेला अतिफ अस्लम, मोहित चौहान, राहत फतेह अली खान आणि आता अरिजित सिंग. या ट्रेंडनुसार निर्माते दिग्दर्शक गाणी लिहिण्याचा आणि दाखवण्याचा अट्टहास करतात, काही जमून जातात, काही फसतात. चिरकाल स्मरणात राहतील, हे फारच दुर्मिळ. सध्याची गाणी आरडी -किशोरदांसारखी अजरामर होतील, ही अपेक्षा तर अजिबात नाहीये, पण अगदीच टेम्पररीली वाजून विस्मरणात जावीत, अशीही नको.

एकंदरीत काय तर गाण्याचं कथेतलं महत्व कमी होत जातंय. ती सध्या फक्त फिलर्स म्हणून किंवा असायला हवीत म्हणून दाखवण्यात येतात. अर्थात, गुलजार आणि जावेद अख्तर अजूनही कार्यरत आहेत, हे भाग्य. शिवाय विषयाला धरून, अर्थपूर्ण लिहिणाऱ्यांची अजूनही एक नवीन फळी उभी आहे आणि पसंतीस उतरते आहे, हे अजून समाधानकारक. पर्सनली सांगायचं झालं तर अमिताभ भट्टाचार्य हा अवलिया चित्रपटाच्या विषयाशी, प्रादेशिक संदर्भांशी, भाषेच्या लहेजासकट नाळ न तुटू देता कथेला पुढे नेणारे गीतलेखन करतो, जे खूप गरजेचे आणि स्तुत्य आहे. सोबत इर्शाद कामिल, प्रसून जोशी, कौसर मुनिर, अंवीता दत्त ही काही नावेही आहेतच.

संगीतकारांबाबत जास्त काही बोलत नाही, कारण सध्या टॉप फॉर्ममध्ये असलेला 'प्रीतम' किती कम्पोसिशन्स खऱ्या देतो, हा खरेतर वादाचा विषय, पण तरीही, त्याने पब्लिकची नस पकडली आहे, हे नाकारता येणार नाही. शंकर-एहसान-लॉय विशेष आवडतात, सध्या जरा कमी दिसतात, पण लवकर परत येतीलच.

तर, तात्पर्य इतकंच की, गीतकार आणि संगीतकारांनी जन्म दिलेल्या अर्भकावर, दिग्दर्शकाने पडद्यावरही चांगले संस्कार करावेत, जेणेकरून एखादी कलाकृती वाया न जाता, अधिकच प्रभावशाली आणि लक्षणीय ठरेल.

- राज जाधव (१४-०२-२०१८)

Comments