शिवा - क्राईम जॉनरचा गेमचेंजर (इन्ट्रो)

पहिला सीन सुरू होतो तो कॉलेजसमोर एक गाडी येऊन थांबते इथून...

कॉलेजवरचा कॅमेरा हळूहळू रस्त्यावर येणाऱ्या गाडीच्या चाकावर, गाडीतून उतरणाऱ्या गणेशच्या पायावर आणि नंतर, बिडी तोंडात टाकणाऱ्या बेरकी चेहरयावर स्थिरावतो. तीच बिडी नंतर पेटवत, चहाच्या टपरीवर 'जेडी'ची वाट पाहत तो थांबतो.

कट टू...

कॉलेजमध्ये जेडी, लेक्चर संपायची वाट पाहतोय. इथेही दोन बाकांच्या मधल्या पॅसेजमधून टॉप अँगलने कॅमेरा मागच्या बाकापासून पुढच्या बाकापर्यंत येत, लेक्चररवर स्थिरावतो आणि लेक्चर संपतं.

सर्व स्टुडंट्स कॉलेजच्या बाहेर निघतात, जेडीही. बाहेर आल्यावर जेडी, गणेशला ज्या कामासाठी बोलावले आहे त्यासाठी इशारा देतो आणि त्यानंतर गणेश आणि त्याचे साथीदार जेडीच्या सांगण्यावरून एकाला, त्याचा साथीदारांसकट  रस्त्यावर झोडपून काढतात.

तो बेशुद्धावस्थेत गाडीमागे पडलेला असताना, एक लॉंग शॉट, गाडीच्या मागच्या धुराच्या नळकांडीवर येऊन स्थिरावतो, गाडी निघते आणि स्क्रीनभर धूर पसरतो, यातच सिनेमाची पाटी पडते, 'शिवा' आणि ओपनिंग क्रेडीट्स सुरू होतात. 

बॅकग्राऊंडमध्ये इलय्या राजाचं ग्रिटी, इंटेन्स म्युझिक वाजत राहतं, पुढे काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार याची ग्वाही देणारं आणि आपली ऑफिशियली त्या दुनियेत एंट्री होते.
हा पहिला सीन फार महत्वाचा आहे, गणेश, हे तसं फारच दुय्यम पात्र (आणि दुर्दैवाने कलाकारही) असलं तरी, हा पहिला सीन अख्ख्या सिनेमाचा माहोल सेट करतो आणि तो पुढे कायम राहतो.

गणेश हा केवळ एक प्यादा आहे 'भवानी' नामक वजीराचा.
हा वजीरही 'तिलकधारी' नावाच्या राजकारणी राजाच्या आदेशानुसार सांगेल तेवढी घरं चालणारा सेवकच, पण अस्तित्वाचा प्रश्न आला तर त्यालाही डसणारा. शांत डोक्याचा, तरीही डोळ्यांनी आग ओकणारा. किरकोळ शरीरयष्टी वाटत असली तरी भवानीची भीती वाटावी एवढा धाक नजरेत, देहबोलीत आणि तुटक हिंदी बोलण्यात नक्कीच जाणवतो.
शिवात असलेला 'दम' पाहून भवानी त्याला जेडीच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून ऑफर देतो, तर तिलकधारी भवानीच्या जागी. पण या सगळ्या चाली खोडून काढत अखेर शिवा त्यांची आणि त्यांच्या धंद्यांची पाळंमुळं उखडून काढतो. अर्थात या प्रवासात त्याला, बऱ्याच आपल्या माणसांना मुकावं लागतं...

क्रमश:

('शिवा' वरील विस्तृत लेखाचा काही भाग, पूर्ण लेख लवकरच..)

- राज जाधव (१६-१०-२०१७)

Comments