साला खडूस


अजून एक उत्कृष्ट परफॉर्मन्स असलेला दुर्लक्षित चित्रपट, 'साला खडूस'.

सध्या खेळावरील चित्रपटांचा मौसम असल्यामुळे यात काही बाबतीत नाविन्य वाटणार नाही. शिवाय माधवनचा कोच काहीसा चक देच्या कबीर खानशी रिलेट होतो. आपल्या शिष्याला शिकवून त्याला स्वःताला प्रूव करायचं आहे. जे त्याला अचिव करता आलं नाही, ते तिच्यामार्फत घडवून दाखवायचं आहे. अर्थात, कबीर खान बऱ्याच अंशी शांतपणे साकारलाय शाहरुखने, त्याच्यातली आग फक्त डोळ्यात आणि कृतीत दिसते. त्याउलट इथे माधवन फक्त साला खडूस नव्हे तर साला सनकी खडूस दाखवलाय. त्याला फक्त त्याचं ध्येय दिसतंय, त्यामध्ये येणाऱ्या सर्व अडथळ्यांना तो उधळून लावतोय, कधी समजावून, कधी रागावून, कधी मारून प्रसंगी पैसे खर्च करूनही.

रितिका सिंग ही एक जबरदस्त फाईंड आहे. अख्ख्या पिच्चरमध्ये ती आजूबाजूला कॅमेरा नसावाच अशी वावरलेली आहे, बिनधास्त. तसा चित्रपटातल्या गाण्यांमुळे फ्लो मंदावतो, पण 'झल्ली फटाका' मध्ये ती जी काय नाचलीये, फुल टू येडपटागत, तिथे आपलेही पाय थिरकल्याशिवाय राहत नाहीत. शिवाय आधी पैश्यासाठी, मग आपल्या बॉक्सर बहिणीसाठी, नंतर कोचवरच्या एकतर्फी प्रेमासाठी आणि शेवटी कोचने तिच्यावर टाकलेल्या विश्वासासाठी, त्याच्या ध्येयासाठी ती सर्व काही झोकून चॅम्पियन बनते.

तशी ती त्याला प्रेमाची कबुली देते तो सीनही मस्त आहे, तो तिला 'मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे, बॉक्सिंगवर लक्ष दे' म्हणून दटावतो तरी तिला काही फरक पडत नाही. पण हळू हळू या दोघांत, लवस्टोरी म्हणता येणार नाही, पण प्रेमाचा एक हळुवार विणला जाणारा धागा दाखवला आहे. शेवटच्या राऊंड पूर्वी, जाकिर हुसेन त्याला ब्लॅकमेल करून रिजाईन करायला लावतो, तेव्हा ती सामना सोडून त्याला भेटायला येते आणि विचारते, "तू माझ्यासाठी रस्त्यावर आलायेस, हे प्रेम नाही तर काय आहे?"

चित्रपटाचा क्लायमॅक्स जरासा फिल्मी वाटतो, पण तो इमोशनल अँगलने पहिला तर पटतो. जाकिर हुसेनने ताकीद देऊन त्याला स्टेडियमच्या आसपासही न फिरकण्याचा आदेश दिलाय. तो टीव्हीवर तिचा सामना बघतोय. पण ही अस्वस्थ आहे, हिची नजर त्याला स्टेडीयमभर शोधते आहे. शेवटी, आपण तिथे गेल्याशिवाय ती जिंकणार नाही, हे त्याला पटतं आणि तो तिथे येतो. जाकिर हुसेन त्याला पुरेपूर प्रयत्न करून बाहेर पाठवतो, पण जाता जाता तो तिला एक मास्टर हिंट देऊन जातो आणि ती जिंकते. (हा सीन बऱ्याच प्रमाणात दंगलमध्ये आमिर-गिरीश कुलकर्णीच्या क्लायमॅक्सच्या सिनची आठवण करून देतो, पण दंगल याच्यानंतर जवळपास वर्षभराने आलाय हे विसरता कामा नये).

ती जिंकल्यामुळे जाकिर हुसेन त्याचे क्रेडिट स्वतःवर घेत आयत्या तव्यावर पोळ्या भाजण्याच्या तयारीत असताना, ती त्याला किक मारून धावत जाऊन माधवनला मिठी मारते. आनंदाने भारावून गेलेला माधवन तिच्या कानात म्हणतो,' मेरी मुहम्मद अली' (तो फोटो शोधून शोधून मी दमलोय, खरं तर याच्यासोबत तोच लावायचा होता, पण सापडलाच नाही, असो). कडा ओलावतात राव इथे.

माधवनने बॉडीवर तर मेहनत घेतलेली आहेच, पण त्याचा 'मास्टर' म्हणून सनकीपणा अंगावर येतो आणि जस्टीफायही होतो. रितिकाने बेफिकीर पासून रागीट, शांत, संयमी आणि शेवटी ध्येयाने पछाडलेली 'मधी' छान साकारली आहे.
रितीकाला मागच्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारात स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला आहे, रिंकू राजगुरूलाही मिळालेला 'सैराट' साठी, त्याच वर्षी. दोघींचे रोल आणि त्यांचा आयाम बघता रितिकाचा जास्त डिजरविंग वाटतो.

- राज जाधव (२७-५-१७)

Comments