'96', मर्मबंधातली एक अमूल्य ठेव


प्रत्येक जण या एका शब्दाशी निगडित असंख्य आठवणींनी नॉस्टॅल्जिक होत राहतो. काही घनदाट, गडद तर काही विस्मृतीत गेलेल्या आठवणी. प्रत्येकाचे भूतकाळात सुटलेले काही धागे अजूनही स्मरणात असतात. कधी कधी त्याची जुळवाजुळव करत बसलो की आठवणींच्या धाग्यांपासून एखादी प्रतिकृती बनते, जी अताशा पुसट झालेली असते, पण तरीही स्मरणात कुठेतरी लख्ख आठवत असते, रुतलेली असते. तिच्या गावी आपण कदाचित अस्तित्वातही नसू, पण तरीही प्रत्येकाने ती प्रतिकृती मनाच्या कप्प्यात जपलेली असते, कधी वाटलेच तर डोकावण्यासाठी.

भूतकाळात हरवलेल्या अश्याच दुनियेत तुम्हाला जायला भाग पाडतो, '96'. विजय सेतुपती आणि त्रिशाची ही फिल्म प्रचंड नॉस्टॅल्जिक आहे. शाळेत एकमेकांच्या प्रेमात पडलेलं एक जोडपं, काही कारणास्तव दुरावतं आणि दुर्दैवाने त्यांचं प्रेम सफल होत नाही. वीस वर्षांनी स्कुलच्या रियुनियनमध्ये त्यांची भेट होते आणि तिथुन पुढे सुरू होतो एक उलटा प्रवास, त्यांच्या पहिल्या भेटीचा, प्रत्येक प्रसंगांचा आणि त्यांच्या अधुऱ्या आठवणींचा. यातच काही अश्या गोष्टी उलगडत जातात की कदाचित दैव त्यांच्या बाजूने असते तर ते आजही एकत्र असले असते अशी परिस्थिती समोर येते.

त्रिशा अत्यंत गोड दिसली आहे, पण इथे खरी बाजी मारली आहे ती विजय सेतुपतीने. भरदार देहयष्टीच्या आतही त्याने जपलेले हळवे मन त्याच्या देहबोलीतून नेमके उतरवले आहे. त्याने साकारलेला नायक हा निरागस, निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक वाटतो, अगदी वीस वर्षांनंतरही.

वीस वर्षांनंतर पुन्हा भेटण्याचा प्रसंग, तिथून पुढे उलगडत गेलेले एकेक किस्से आणि जुन्या आठवणी, काही स्पोईलर्स ठरावेत असे (त्रिशा आणि आपल्यासाठी) सौम्य धक्के आणि नायकाने त्रिशाच्या जपलेल्या आठवणी हा एक खूप नाजूक आणि हळवा भाग आहे चित्रपटाचा. 'ती सध्या काय करते' या प्रकारे उलगडला असता तर नक्कीच अधिक प्रभावी झाला असता.

ही पडद्यावरची काव्यात्मक अनुभूती किमान एकदा तरी अनुभवावी अशीच आहे.

- राज जाधव (०६-१२-२०१८)

Comments

Popular Posts